ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थकाढल्याने हा प्रकार घडल्याचा खुलासा नागराजने केला आहे. याआधी सैराट चित्रपटामुळे मराठा समाजाच्या मनात खदखद असल्याची टीका आठवले यांनी केली होती. त्यावर नागराजने हे गंमतीशीर आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.
मात्र सैराट चित्रपटाला अनेकदा अतार्किक रितीने अनेक घटनांशी उगीच जोडले जात आहे. हे अत्यंत गंमतीशीर आहे, असे प्रतिक्रियेत सांगायचे असल्याचा खुलासा नागराजने केला आहे. संबंधित प्रतिक्रियेचा विपर्यस्त अर्थ निघाल्याबाबत नागराजने खेद व्यक्त केला आहे. शिवाय आठवले यांना फोन करून माफी मागितल्याचेही त्याने सोशल मीडियावर सांगितले. दरम्यान, घाटकोपर येथे नागराजविरोधात रिपाइंने बुधवारी तीव्र निदर्शने केली. हा गंमतीचा विषय नसून हिंमतीचा विषय असल्याची प्रतिक्रिया रिपाइंने व्यक्त केली आहे.