ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी, हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. परंतु सरसंघचालकांनी असे वक्तव्य केलेच नसून त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे. देशात समान लोकसंख्या धोरण असावे या संघाच्या जुन्या मागणीसंदर्भात ते बोलले होते, असे संघाने स्पष्ट केले आहे.
आग्रा येथिल एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रीय राजकारणातदेखील यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. बसपा अध्यक्ष मायावती तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील भागवत यांच्यावर टीका केली.
सोमवारी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केले. देशात हिंदूच्या लोकसंख्या वाढीचा दर २.१ टक्के आहे, तर मुसलमानांचा ५.३ टक्के आहे. अशा स्थितीत ५० वर्षात देश मुस्लिमबहुल होईल का ?असा डॉ.भागवत यांना शिक्षकांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भारतात हिंदूंना जास्त मुलांना जन्म देण्यापासून कोणता कायदा अडवतो हे सांगा, असे सरसंघचालकांनी उत्तर दिले होते. हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ नव्हता. देशात समान लोकसंख्या धोरण असले पाहिजे हा संघाचा अगोदरपासूनचा आग्रह आहे. याकडेच सरसंघचालकांना लक्ष वेधायचे होते, असे डॉ.वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.