महसूल मंत्र्यांनीच महसूल बुडवला; चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:04 PM2019-06-27T13:04:47+5:302019-06-27T13:08:12+5:30
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फलक फडकवत निषेध
मुंबई: बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा ४२ कोटींचा महसूल बुडवल्याचा आरोप करत विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा घोटाळा समोर आणला. त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी विशेष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय घेऊन ३४२ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील एका निर्णयातून राज्य सरकारचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर पुण्यातीलच बालेवाडी येथील दुसऱ्या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मैदानाच्या आरक्षित जागेवर ३०० कोटींची इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेदरम्यान उपस्थितही केला होता. शिवाय याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागणी देखील केली.
निवडणूक प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भाजपाने सत्ता मिळवली. मात्र, भाजपाचे १६ मंत्रीच भ्रष्टाचार करायला लागले तर राज्याचा कारभार चुकीच्या सरकारच्या हातात आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीने सरकारला लक्ष्य केले. राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध केला.