मुंबई - आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या एका विधानावरून आसाम विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना अटक करावी अशी मागणी आसाम विधानसभेत विरोधकांनी लावून धरली आहे. तर भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं सांगत बच्चू कडू यांनी या वादग्रस्त विधानावरून सारवासारव केली आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, राज्यातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात तुम्ही समिती गठित करण्यापेक्षा एखादा एक्शन प्लॅन तयार करा. जेवढे रस्त्यावर आहेत तेवढे उचला आणि आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये अशा कुत्र्यांना किंमत आहे. किमान ८-९ हजारांना विकले जातात. याबाबत माहिती घ्या. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा विचारले. जसं इथं बोकड खातात तसं तिकडे कुत्रे खातात. म्हणून तेथील व्यापारांना बोलावून तुम्ही चर्चा केली तर एका दिवसांत यावर तोडगा निघू शकतो. तिथल्या सरकारशी बोला असं कडू यांनी विधानसभेत सांगितले.
आसामच्या विधानसभेत गदारोळशुक्रवारी आसाम विधानसभेत राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषण सुरु असताना कडू यांच्या विधानावरून विरोधकांनी गोंधळ घातला. १५ मिनिटे भाषण थांबवायला लागले. त्यानंतर काँग्रेस आमदार कमलाख्या डे यांनी हा मुद्दा उचलला. आसामबाबत वादग्रस्त विधान करूनही सरकारनं मौन का बाळगले असा सवाल त्यांनी सभागृहात केला. आसामचे लोक कुत्र्याचे मटण खातात हे ते बोलले. हा भावनिक विषय आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
बच्चू कडू यांनी केली सारवासारवआसाम विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर आमदार बच्चू कडू यांनी या वादावर सारवासारव करत नागालँडमधील लोक कुत्रे खातात मला वाटलं आसाममधील खातात. ते दोन्ही राज्य जवळपास आहेत. ते चुकून आसाम बोललो, नागालँड बोलायला हवं होतं. हे चुकीने घडलं. त्यामुळे आसामच्या जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले.