मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत वादात सापडले आहेत. सामंत यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडेदेखील डिग्रीमुळे वादात सापडले होते. विशेष म्हणजे या दोन्ही आजी-माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या डिग्री ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या आहेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या डिग्रीबद्दलची माहिती मिळवली. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. ‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जायचं. त्याची डिग्री दिली जायची, तशी मी घेतली. उद्योजक होण्यासाठी मी डिग्री घेतली होती. त्या डिग्रीच्या आधारे मी शासकीय नोकरी किंवा घर घेतलं नाही. त्या डिग्रीचा वापर करुन मी कोणताही शासकीय लाभ घेतला नाही’, असा दावा त्यांनी केला. मी मंत्री झाल्यावर अचानक हे प्रकरण चर्चेत आलं. माझ्या डिग्रीचा वाद उकरुन एखाद्याला रात्री गोळ्या न घेता शांतपणे झोप येत असेल, तर चांगलं आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.
अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 12:44 PM