मुंबई - देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्रात या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औंरगाबाद, ठाणे, अहमदनगर अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापूरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी म्हणून शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये असंही सांगण्यात आलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवण्याचं काम शिवसेनेच्या नेत्यांकडून केलं जात आहे.
शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना उद्धव ठाकरे यांनी 15 दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला. मात्र, शिवेसनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला हरताळ फासलं आहे यावरुन विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे खासदार या आवाहनाला प्रतिसाद देत नसतील तर ते दुर्दैवी आहे. पक्षातील नेतेच ऐकत नसतील तर बाकीच्यांनी काय करायचं? या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी काळजी घ्यायला हवी. शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन केले जात असेल तर पक्ष आणि सरकारमध्ये विसंगती असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत, त्यामुळे पक्षात त्यांचे ऐकलं जात नाही का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
नगर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा काढण्यात आली होती. या साई परिक्रमेत ग्रामस्थ तसेच देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. 14 किलोमीटर अंतर पार करत साई परिक्रमा यात्रा द्वारकामाई मंदिरापर्यंत आल्यानंतर समाप्त झाली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या परिक्रमेत सहभागी झाल्याचे दिसून आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही त्याची पर्वा न करता सदाशिव लोखंडे यांनी साई परिक्रमेला उपस्थिती दर्शवली होती. तसेच ठाण्यातही शिवसेना नेत्यांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
मात्र शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांना परिक्रमेच्या शुभारंभ आणि सांगतेला उपस्थित नव्हतो. तर शिर्डीत असताना मॉर्निंग वॉकला जात असतो. रविवारी मोर्निंग वॉक करताना रस्त्यात परिक्रमावासीय भेटले, त्यांच्याशी चालतांना संवाद साधला असा दावा त्यांनी केला आहे.