संदीप प्रधान, मुंबईभाजपा-शिवसेना या पक्षांमधील अनेकांची माथी सत्तेत बसल्यावर बिघडतात याचे अनेक दाखले १५ वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाले होते. भाजपात या घडीला मुख्यमंत्रिपदाचे चार-पाच दावेदार असल्याने भविष्यात अंतर्गत संघर्ष टाळण्याचे आव्हान या पक्षासमोर असेल. शिवसेनेला सोबत घेतल्यावर मात्र कुणाला तरी वडीलधाऱ्याच्या भूमिकेत राहावे लागेल, तरच सरकार संघर्षाविना कारभार करू शकेल.भाजपाला सत्ता दिसू लागताच गेल्या दोन दिवसांत या पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धक आक्रमक झाले होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाणार, असे दिसताच विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रिपदाकरिता कुणीही फ्रंटनर नाही, असे मत व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी आपण मास लीडर असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील अन्य नेते मेट्रो लीडर असल्याची प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्रिपदाकरिता पक्षाकडे चार-पाच दावेदार आहेत व हे पक्षांतर्गत लोकशाहीचे लक्षण आहे, हे दावे करणे सोपे असले तरी मुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीमधील ठिणगी भविष्यात सरकारमध्ये अंतर्गत संघर्षाचा वणवा पेटवणार नाही, याची कुठलीही खात्री देता येणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ खडसे व सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्यांच्या हाताखाली सरकारमध्ये काम करणार का? अशावेळी त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील? तावडे व पंकजा यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घालण्याची जबाबदारी मोदी की शहा पार पाडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याखेरीज भाजपाची आगामी वाटचाल कशी असेल, ते सांगता येणार नाही. भाजपात राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी केलेल्यांचा एक गट असून, राष्ट्रवादीशी संघर्ष करणाऱ्यांचा गट आहे. भाजपा अंतर्गत तसेच शिवसेना-भाजपामधील याच मतभेदांना रुंद करण्याचा प्रयत्न भाजपाच्या सरकारला स्वत:हून पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीकडून केला जाईल. मीडिया देखील या प्रयत्नांना खतपाणी देईल. भाजपाच्या अनेक नेत्यांना वृत्तपत्रांच्या बातम्यांकरिता गॉसिप पुरवण्यामध्ये रस आहे, ही बाब लपून राहिलेली नाही.
भाजपात दुफळीचे आव्हान
By admin | Published: October 20, 2014 5:29 AM