लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोपर्डी येथे पीडित मुलीचे स्मारक बांधण्याच्या भय्यूमहाराज यांच्या घोषणेचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला असून, बलात्कार आणि हत्या प्रकरणाला उद्या १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना, न्याय न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेडचे राज्यभरातील कार्यकर्ते कोपर्डी येथे उपस्थित राहणार आहेत. संभाजी ब्रिगेडने ही माहिती बुधवारी कळविली.विकास पासलकर, प्रशांत धुमाळ, हर्षवर्धन मगदूम, मयूर शिरोळे, प्रदीप तांबे, अजय भोसले, सागर आल्हाट आदींनी या संदर्भातील निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे. नराधमांना शिक्षा होणे अपेक्षित असताना त्यासाठी संघर्ष न करता समाजाला दुखावणाऱ्या घटनेचे उदात्तीकरण करणे खेदाचे आहे, असे या निवेदनात म्हटले असून, मराठा क्रांती मोर्चाचे श्रेय घेण्याच्या नादात स्मारकासाठी अट्टहास करणाऱ्या भय्यू महाराज यांचे मनसुबे उधळून लावले जातील. प्रसिद्धीसाठी त्यांनी स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या घटनेचे राजकारण करू नये; अन्यथा संभाजी ब्रिगेडचा संघर्ष अटळ आहे, असे म्हटले आहे. स्मारक पराक्रम, शौर्याचे प्रतीक असते. समाजाची मान उंचावणारे असते. कोपर्डी येथील मुलीसोबत झालेली घटना अमानवी होती. ती समाजाची मान खाली घालायला लावणारी आहे. त्यामुळे संतप्त समाजाने राज्यभरात मोर्चे काढले. समाजाच्या भावना आजही संतप्त असताना देशमुख चुकीची कल्पना राबवू पाहत आहेत. हा प्रकार समाज खपवून घेणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
कोपर्डीत पीडित मुलीचे स्मारक बांधण्यास विरोध
By admin | Published: July 13, 2017 1:05 AM