ठाणे : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना रुचत व पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका करण्याची स्पर्धा लागली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी टीका करत राहावी. या सर्वांना विकासकामानेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष अभियान घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा प्रारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो. मात्र, सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे हा पहाटेपर्यंत काम करतो. या आरोपांना मी कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आला काय, गेला काय कोणाला चिंता नसते. मात्र, नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी याची चिंता विरोधकांनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला.
कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरू केल्या. उद्योग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे, त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने विरोधकांना विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले.
धडाडीचे निर्णय घेतो म्हणून मुख्यमंत्री केले मुख्यमंत्री कोण होईल, याची सर्वांना उत्सुकता होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले, असे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
आयुक्तांकरिता पुढची दालने उघडी होतात ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली. म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्त्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्ह्णून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी सांगितले.