महाड : किल्ले रायगडावर २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दंगामुक्त महाराष्ट्र संकल्प मेळाव्याला आपला विरोध नाही. तो कार्यक्रम मुस्लीम संघटनांनी जरुर करावा मात्र त्या कार्यक्रमादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास तो प्रकार आपण मुळीच सहन करणार नाही. त्याला जशाच तसे उत्तर देवू आणि त्यासाठी रायगड परिसरात तीन हजार शिवसैनिक खडा पहारा देतील, असे स्पष्ट प्रतिपादन महाडचे शिवसेना आ. भरत गोगावले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.याच दिवशी गडावर छत्रपती शिवरायांचा बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा प्रकार बिलकूल सहन करणार नाही आणि असा प्रकार कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गडावरून खाली उतरू देणार नाही, असा सज्जड इशाराही आ. गोगावले यांनी यावेळी दिला. मंगळवारी सकाळी काश्मीरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवसेनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवाजी चौकात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या पुतळ्याचे दहन करून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. २४ सप्टेंबरला काही बौद्ध धर्मीय संघटना, छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ बौद्ध होते असे भासवून बौद्ध धर्माच्या पद्धतीने राज्याभिषेक सोहळा करणार आहेत. या कार्यक्रमाला मात्र शिवसेना ठाम विरोध करेल, असेही आ. गोगावले यांनी स्पष्ट केले. यावेळी जि. प. सदस्य सुरेश कालगुडे, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, जि. प. सदस्य नीलेश ताठरे आदि सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)
रायगड किल्ल्यावर बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक करण्यास विरोध
By admin | Published: September 21, 2016 3:22 AM