मुंबई : शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बोरीवली येथील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी शेट्टी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या राज्यासमोर असताना एकीकडे राज्य सरकार विविध सोहळ्यांच्या आयोजनात व्यस्त आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपा नेते बेताल वक्तव्ये करून शेतकऱ्यांच्या अगतिकतेची थट्टा करीत आहेत. शेतकऱ्याच्या आत्महत्येला फॅशन ठरविणाऱ्या शेट्टी यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. आत्महत्येला फॅशन म्हणणे हा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे. शिवाय शेट्टी यांच्या विधानामुळे राष्ट्रीय एकात्मतेस बाधा पोहोचली आहे. त्यामुळे शेट्टी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली. उत्तर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष इंद्रपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तसे निवेदन कांदिवली पोलिसांना दिले. राज्यामध्ये दुष्काळ असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी राज्यातील फडणवीस सरकार कोट्यवधींचे सोहळे करण्यात मग्न आहे. अपुऱ्या निधीचे कारण देत शेतकऱ्यांना मदत नाकारणारे सरकार मेक इन इंडियावर मात्र कोट्यवधीची उधळण करते. राज्यात दर महिन्याला सरकारी सोहळे आणि इव्हेंट होत आहेत. त्यामुळे हे सरकार आहे की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, असा प्रश्न पडला आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या या सोहळ्यांचा हिशेब सरकारने द्यावा, अशी मागणी अहिर यांनी केली. (प्रतिनिधी)
गोपाळ शेट्टी यांंच्या कार्यालयासमोर निदर्शने
By admin | Published: February 20, 2016 3:00 AM