नाशिक : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी निवडणूक आयोगाने पाच लाख रुपये खर्च करण्याचे निर्बंध घातल्यामुळे विविध इच्छुकांकडून निवडणूक खर्च लपविण्याचा खटाटोप सुरू असतो. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वीच मतदारांना भुरळ घालण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात असून, शहराबाहेरच्या शेतमळ्यात हुरडा पार्ट्यांचे आयोजन करून त्यातून निवडणूक प्रचार साधला जात आहे. महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुकांना केंद्र सरकारने लादलेला नोटाबंदीचा निर्णय तसेच निवडणूक आयोगाची निवडणूक खर्चाची मर्यादा यामुळे प्रचाराचे नियोजन करताना विविध समस्या येत असून, मतदारांना थेट प्रलोभन देऊन आपल्या बाजूला वळविणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांनी नोटाबंदी आणि निवडणूक खर्चाच्या कात्रीतून बचावासाठी प्रभागातील समर्थकांना व त्यांच्या नातेवाइकांना आमंत्रित करून शहराबाहेरच्या शेतमळ्यात हुरडा पार्ट्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या प्रभागातून इच्छुक अपक्षांचाही समावेश आहे. महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेकांचे शहराबाहेर फार्महाऊस तथा शेतमळे आहेत. अशा ठिकाणी हुरडा पार्ट्या आयोजित करून खर्चात बचत करतानाच निवडणूक खर्च मर्यादेतून सुटण्याचीही पळवाट शोधली जात आहे.
हुरडा पार्ट्यांतून निवडणूक प्रचार - खर्च लपविण्याचा खटाटोप
By admin | Published: January 29, 2017 2:32 PM