"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?"; तुळजापूर 'ड्रेस कोड'वरून अजित पवारांनी घेतली 'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:41 PM2023-05-19T17:41:42+5:302023-05-19T17:42:14+5:30
तुळजाभवानी मंदिर समितीच्या आदेशावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या आदेशावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. कोणत्या देवानं सांगितलं की हाफ पॅंट घालून दर्शन घेऊ नये, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आता या देवीच्या मंदिरामध्ये 'वेस्टर्न' कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना 'एन्ट्री' बंद करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या या आदेशावर बोलताना अजित पवारांनी आज एकसिवाव्या शतकात अशा घटना घडतात हे पाहून कमीपणा वाटतो असे म्हटले आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, आम्ही शाळेत असताना आम्हाला दहावीपर्यंत हाफ पॅंट घालून यावं लागत होतं. तेव्हा घरचे सांगायचे की तुम्ही अकरावीत गेल्यावर तुम्हाला फुल पॅंट दिली जाईल. ही अशी पद्धत ग्रामीण भागात होती. मुलं हाफ पॅंट घालून आली म्हणून दर्शन घेऊन द्यायचं नाही हे असं कुणी सांगितलं? कोणत्या देवानं सांगितलं हाफ पॅंट घालून दर्शन घेऊ नका? काही जण याचा विपर्यास करत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांचा संतप्त सवाल
तसेच भारतीय संस्कृतीप्रमाणे अनेक वेगगवेगळ्या धर्मात, पंथात वेगवेगळा पेहराव आहे, काही ठिकाणी लुंगी पायजमा घालण्याची पद्धत आहे, तर अलीकडे जिन्स पॅंट मोठ्या प्रमाणात घातली जाते. पेहराव योग्य असावा याबद्दल दुमत असायचे कारण नाही पण वळून बघतील असे काही परिधान केल्यास आपण समजू शकतो. ते देखील नियमात नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना हाफ पॅंटमुळे तुळजापूर मंदिरात प्रवेश नाकारणे हे आक्षेपार्ह असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. याशिवाय काही जण आव्हान करतायत की, या देशाला पुन्हा एकदा शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गरज आहे. हे महापुरूष पुन्हा एकदा जन्माला आले पाहिजेत. आज एकविसाव्या शतकात अशा घटना घडतात हे पाहून एक लोकप्रतिनिधी म्हणून कमीपणा वाटतो, असे त्यांनी अधिक सांगितले.
काय आहेत नियम?
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकाेपऱ्यातून भाविक माेठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे केवळ यात्राेत्सव काळातच नव्हे तर एरवीही इथे गर्दी असते. देवीच्या दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरूपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती. मात्र, नुकतेच मंदिर संस्थानच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत. जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशाेभनिय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बरमुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभावानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. निर्णयाची चाेख अंमलबजावणी व्हावी, यासाठी तातडीने मंदिर परिसरात याबाबतचे फलकही लावले आहेत. गुरूवारपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली आहे.