माईक, चिठ्ठी अन् राजकीय टोलेबाजी; देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 02:51 PM2022-07-16T14:51:34+5:302022-07-16T14:52:03+5:30
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक फडणवीसांनी हातात घेतला. हा व्हिडिओ बराच गाजला.
मुंबई - राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोपवल्यानंतर भाजपाने अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे मुख्यमंत्री असलेले फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या नेतृत्वात काम करावं लागत आहे. त्यातच अनेकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील काही किस्से सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक फडणवीसांनी हातात घेतला. हा व्हिडिओ बराच गाजला. त्यात मूळात हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे असं पत्रकाराने म्हटलं होते. परंतु विरोधकांनी या व्हिडिओचं भांडवलं करत खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं सांगत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यानंतर पुन्हा एका पत्रकार परिषदेत फडणवीसांनी चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिली. त्याचीही बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे सुपर सीम कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत कुणी ताम्रपट घेऊ जन्माला आले नाही. आत्ताच माईक ओढाओढी चालली, कागदं एकमेकांना देतायेत. कुणाचा कुणाला मेळ नाही. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. कशासाठी थांबवलं आहे. पालकमंत्री नेमा, सध्या दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत. ज्याप्रकारे निर्णय व्हायला हवे ते होताना दिसत नाही असं त्यांनी सांगितले तर नवीन आलेले सरकार गोंधळलेले आहे. उपमुख्यमंत्री सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या चूका काढत आहेत. काहीतरी एकनाथ शिंदे यांच्यामागे षडयंत्र भाजपा करतंय हा माझा आरोप असा टोला राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला.
तर माईक म्यूट करून व्हिडिओ फिरवणं, माझ्या मुख्यमंत्र्यांना मी चिठ्ठी लिहिली तर बिघडलं कुठे? कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नको, आमचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतोय परंतु काही लोकांना हे बघवत नाही. आता तुम्हाला विरोधात बसण्याची सवय केली पाहिजे असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. त्यामुळे राज्यात माईक, चिठ्ठी आणि राजकीय टोलेबाजीला रंग आला आहे.