मुंबईत बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना शेतीतलं काय कळणार; अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:10 PM2022-07-29T15:10:52+5:302022-07-29T15:11:21+5:30

शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

Opposition Leader Ajit Pawar Targets BJP who criticised his vidarbh tour | मुंबईत बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना शेतीतलं काय कळणार; अजित पवारांचा टोला

मुंबईत बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना शेतीतलं काय कळणार; अजित पवारांचा टोला

Next

वर्धा - आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता थांबण्याची त्याची तयारी नाही. ही बाब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आज वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जिथे जीवीतहानी झाली, तिथे चार लाखांची मदत मिळाली. मात्र जनावरेही मृत्यूमुखी पडली त्याचे पैसे मिळालेले नाहीत.वर्ध्यात अजुनही सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्याशिवाय त्यांना मदतही मिळणार नाही असेही अजित पवार म्हणाले. 

अजित पवार यांनी विदर्भ दौरा सुरु केल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी टीका केली. या टिकेला उत्तर देताना मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरूनच बघावं लागतं असा टोला लगावला. विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. 

वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आणि तिथून वाहणाऱ्या नद्या,ओढे यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील १२ ते १५ दिवस पाऊस असल्यामुळे शेतमजुरांना कामाला जाता आले नाही. त्यामुळे त्यांचे उपजिविकेचे साधन थांबले.या सर्व परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर वस्तुस्थिती मांडणार आहोत. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हरभरा,तुरीचे बियाणे उपलब्ध करुन दिले पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कापूस आणि सोयाबीनची वाढ खुंटली आहे. कापूस आणि सोयाबीन ही या भागातील महत्त्वाची पिके आहेत. त्यामुळे या पिकांना हेक्टरी भरीव मदत देणे गरजेचे आहे. खरीपाच्या पेरणीचा हंगाम आता निघून गेलाय. रब्बीला अजून वेळ आहे. त्यामुळे आता पुन्हा पेरणी केली तर ती धड खरीपात मोडणार नाही आणि धड रब्बीतही मोडणार नाही. त्यामुळे चारही कृषी विद्यापीठे, कृषी आयुक्तांनी, कृषी सचिवांनी आता यात लक्ष घालून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करावा, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली आहे.

Web Title: Opposition Leader Ajit Pawar Targets BJP who criticised his vidarbh tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.