विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज?; दिल्लीतील NCP चं राष्ट्रीय अधिवेशन चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:57 AM2022-09-12T06:57:12+5:302022-09-12T06:57:38+5:30

अधिवेशनाच्या अखेरीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना भाषणासाठी पाचारण केले खरे, परंतु त्यावेळी अजितदादा व्यासपीठावर उपस्थित नव्हते.

Opposition leader Ajit Pawar upset?; National convention of NCP in Delhi is in discussion | विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज?; दिल्लीतील NCP चं राष्ट्रीय अधिवेशन चर्चेत

विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज?; दिल्लीतील NCP चं राष्ट्रीय अधिवेशन चर्चेत

googlenewsNext

नवी दिल्ली -  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. या अधिवेशनाला देशभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची भाषणे झाली. परंतु राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले अजित पवार यांचे  दोन्ही दिवस भाषण होऊ शकले नाही. तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलतील, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.  

अधिवेशनाच्या अखेरीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना भाषणासाठी पाचारण केले खरे, परंतु त्यावेळी अजितदादा व्यासपीठावर उपस्थित नव्हते. यामुळे अजितदादांचे भाषण होऊ शकले नाही. या अधिवेशनात शरद पवारांनी भाजपावर हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या काळात कृषी उत्पादनात व एकूण प्रगतीमध्ये घट झाल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यूपीएच्या काळात १५० टक्क्यांनी विकास झाला होता. हा दर सध्या केवळ ४४ टक्क्यांवर आला आहे. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सक्षमीकरणाचे भाषण करतात व त्यांच्याच राज्यात बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांवर दया दाखवितात, हा कोणता न्याय आहे, असा सवाल त्यांनी केला.

तर शरद पवारांचे मार्गदर्शन आपल्याला आहे. आपल्याकडे मोठी वैचारिक ताकद आहे. पवार साहेब ज्यावेळी देशाचे कृषिमंत्री होते त्यावेळी अन्न धान्य आयात करणारा देश निर्यात करणारा झाला. हे पवार साहेबांच्या निर्णय क्षमतेने शक्य झाले. युपीए सरकारच्या काळात देशात सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे देशातील प्रत्येक घटकांनी प्रगती केली. आज सामान्य जनतेवर जीएसटी लादला जात आहे. नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. देशात महागाईने नागरिक हैराण झाले आहेत, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे, बिगर भाजपा शासित सरकार उलथवून टाकण्याचे काम सुरू आहे. आठ वर्षात केंद्र सरकारने काय केले याचा कोणताही हिशोब नाही. देश अधोगतीकडे जात असल्याची खरी परिस्थिती मान्य करण्यास सरकार तयार नाही असा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

Web Title: Opposition leader Ajit Pawar upset?; National convention of NCP in Delhi is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.