संगमनेर (जि. अहमदनगर) : आम्ही कायम काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ आहोत. सर्वांना बरोबर घेऊन सातत्याने जनतेच्या विकासाचे काम केले. पण राज्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी असणारे विरोधीपक्षनेते राज्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या प्रचाराला जाण्याचे सोडून कायमच तालुक्यातील कनोली, मनोली, कनकापूर या गावातच फिरत असतात, असा आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंवर केला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तालुक्यात झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते. थोरात म्हणाले, जिल्ह्यात ज्यांच्यावर पक्ष वाढविण्याची जबाबदारी आहे ते संगमनेर तालुक्यात भाजप-सेनेचे मुखवटे लावून उमेदवार उभे करीत आहेत. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना ते मदत करीत आहेत. यापूर्वीही त्यांचे असे उपद्रव मूल्य सुरुच होते, असा आरोपही थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता केला.काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे पक्षांतील उमेदवरांऐवजी इतरांना दिले. त्यामुळे निष्ठावान लोकांवर अन्याय झाला आहे. तालुक्यात काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात जे उमेदवार उभे केले, ते भाजप सेनेचे मुखवटे लावलेले आहेत. राज्यात भाजप व सेनेचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या विरुध्द निर्णय घेत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढायला पाहिजे. त्यांनी राज्यात दौरे करुन काँग्रेसचा प्रचार केला पाहिजे. मात्र तसे होत नाही, हे पक्षाच्या दृष्टीने हे चांगले नाही, असेही थोरात म्हणाले. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेते गटातच अडकले!
By admin | Published: February 10, 2017 5:06 AM