मुंबई: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह भाजप नेत्यांकडून ही विधाने होत आहेत. याविरोधात विरोधकांनी येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोर्चाला अद्याप परवानगी नाहीआज 15 तारीख आहे, पण अद्याप 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन संजय राऊत यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, 'या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. त्यामुळे 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,' असा इशारा राऊतांनी दिला.
...तर मोर्चा काढला नसताते पुढे म्हणाले की, 'महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचे प्रकरण फार गंभीर आहे. घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंसारख्या महापुरुषांविषयी अपमानास्पद बोलत असेल आणि सरकार याचे खुले समर्थन करत असेल, तर हे अत्यंत निषेधार्ह आहे. याविरोधात मोर्चा का काढू नये? मोर्चा काढू नये असे वाटत होते, तर राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. अजून ती कारवाई झालेली नाही, त्यामुळे आम्ही मोर्चा काढणारच,' असंही संजय म्हणाले.