पुणे : टीका करणे हा विरोधकांचा नैतिक अधिकार आहे. यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. सर्वांनीच हो हो म्हटलं तर कसं चालेल. आमचे सरकार दडपशाहीचे नाही. उलट दिलदारपणे टीका करत राहावी. त्यामुळे सरकारवर उत्तरदायित्व राहते असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. बेर्डे यांच्यासह मिलिंद अष्टेकर (अध्यक्ष कोल्हापूर), संतोष चाकरे (राज्य समन्वयक), सिद्धेश्वर झाडबुके (प्रदेश उपाध्यक्ष), विनोद खेडकर प्रदेश (सरचिटणीस), जादूगार जितेंद्र रघुवीर (सरचिटणीस), प्रशांत खिलारे प्रदेश (सरचिटणीस ), मच्छिन्द्र धुमाळ ( प्रदेश संघटक), डॉ सुधीर निकम (मराठवाडा विभागीय अध्यक्ष) यांनीही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
कोविड रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं असल्याचं म्हटलं जातं आहे, असे विचारल्यावर सुळे यांनी विरोधकांचे चांगलेच कान उपटले. देशाच्या विरोधात एवढी मोठी आव्हाने येतात. तेव्हा मी राजकारण बघत नाही. जगात आरोग्याच्या दृष्टीने मोठं आव्हान आहे. लोकांची सेवा करणं आणि काय करता येईल याबाबत सल्ला देणं हे प्रत्येकाचे काम आहे. टीका करण खूप सोपं असतं. पण त्या पदावर असून काम करणं अवघड असत. ' इकॉनॉमिक्स' च्या आजच्या अंकातच मुंबईत चांगले काम झाले असल्याचे लिहिले आहे. विरोधकांनी टीका जरूर करावी कारण आमचे दडपशाहीचे सरकार नाही.
पुण्यात रुग्णवाहिका मिळत नाहीयेत, रुग्णांना ठेवायला रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीयेत, या गोष्टी होताच कामा नयेत. याकरिता एक ट्रॅकिंग सिस्टीम कार्यरत केली जाणार आहे. तसेच खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. याचे पालन केले नाही अथवा रुग्णाचे शोषण केले तर त्या रुग्णालयावर कारवाई करण्यापर्यंत सरकार गंभीर पावले उचलत असल्याचे सुळे यांनी सांगितले.
शिवसेनेचे पाच नगरसेवक महाआघाडीत प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे, त्याविषयी विचारले असता त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. तुमच्या घरात काय होते जसा हा वैयक्तिक प्रश्न आहे तसाच हा महाविकासआघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. तो आम्ही आमच्या घरात सोडवू. कुणाच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही असे त्या म्हणाल्या.
....
लोककलांना पुढे आणणे, ज्येष्ठ कलाकारांचे मानधन वाढविणे, महिला कलाकार, कर्मचारी यांकरिता बचतगट योजना सुरू करणे, मालिकेतील कलाकारांना 90 दिवसांनी पेमेंट मिळते ते 30 दिवसांवर आणणे, 20 तासाची शिफ्ट 8 तासांवर आणणे, राज्य शासनाच्या जाहिरातीत मराठी कलाकारांना प्राधान्य देणे या गोष्टींवर भर दिला जाणार आहे- प्रिया बेर्डे, अभिनेत्री ....