मुंबई - राज्यसभेसाठी आज भाजपाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित मानला जातो. पण भाजपाने आज चौथ्या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळं राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली आहे.
आज सोमवार 12 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. 13मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर; 15 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सहा पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आता भाजपाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला भाजपाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा 23 मार्च रोजी मतदान घेण्यात येईल.
23 मार्चला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होईल ही राजकीय क्षेत्रातील अपेक्षा भारतीय जनता पक्षाने उधळून लावली असून, भाजपने या निवडणूकीत सातवा उमदेवार उतरवला आहे. भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.