मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा कोणत्याही धर्म-जातीविरोधात नाही. या कायद्याला होत असलेला विरोध अनाठायी आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षातर्फे रविवारी वांद्रे येथे रॅली काढण्यात आली, त्यावेळी आठवले यांनी हे मत व्यक्त केले.आठवले म्हणाले, हा कायदा लोकशाही मार्गाने संसदेत मंजुरी मिळून मंजूर करण्यात आला आहे. हा कायदा देशाच्या हितासाठी आहे. देशातील मुस्लिमांच्या किंवा अन्य कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात हा कायदा नाही. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात समाज विघातक शक्तींकडून होणाऱ्या अपप्रचाराला बळी पडू नका. नागरिकत्व सुधारणा कायदा देशाच्या हिताचा असल्याने रिपब्लिकन पक्ष या कायद्याचे समर्थन करत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रविवारी पक्षातर्फे वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आठवले यांच्या नेतृत्वात ‘आय सपोर्ट सीएए रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी पक्षाच्या महिला आघाडीच्या मार्गदर्शक सीमा आठवले, मुंबई अध्यक्ष गौैतम सोनावणे, काकासाहेब खंबाळकर, अॅड. आशा लांडगे, सिद्धार्थ कासारे, हेमंत रणपिसे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सुधारित नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध अनाठायी - आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:25 AM