वसई : अन्य राज्यात वीज दर ३५ ते ५० टक्के असताना महाराष्ट्र राज्यात आधीच जास्त असलेले वीज दर आणखीन वाढवण्याची मागणी ग्राहकांना लुटणारी असून महावितरण कंपनीस वाढ मुळीच देऊ नये अशी मागणी प्रदेश जनता दलाचे नेते व राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि महासचिव मनवेल तुस्कानो यांनी वीज नियमाक आयोगासमोर सुनावणीत बोलताना केली. अन्य राज्यातील वीज दराच्या पातळीवर येईपर्यंत वीज दर कमी करावेत (१०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर कमी करावेत) अशीही मागणी त्यांनी केली. महावितरणे ५६३७२ कोटी रुपये दरवाढीसाठी वीज नियमाक आयोगासमोर पिटीशन दाखल केला आहे. त्याची सुनावणी नेरुळ येथे तीन न्यायमुर्तींसमोर झाली. यावेळी मनवेल तुस्कानो यांनी भ्रष्टाचार, गलथान कारभार, वीज गळती, वीज चोरी, थकबाकीदार यांच्यामुळे आलेली तुट भरुन काढण्यासाठी सर्व ग्राहकांवर वीज दरवाढ करु नये, देशात समान वीज दर असावेत, मुंबईत तीन वितरण कंपन्या आहेत, त्यांचे दर कमी मग राज्यात जास्त कसे असे मुद्दे आयोगासमोर मांडले. ५५ हजार कोटीचे कर्ज फिटल्यानंतर वीज दर कमी करु असे वीज मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी वीज ग्राहकांच्या माथी मारणार काय? असेही मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीत विचारले. वसईत लोकांना भरमसाठ बिले आली असल्याचे सांगत सदोष वीज मीटरमुळे बिले अधिक आली आहेत असे १० लाख वीज मीटर सदोष आढळले आहेत. रोलॅक्स कंपनीचे सदोष मीटर कुणी घेतले त्याची चौकशी व्हावी. रोलॅक्सची २९ कोटीची बँक गॅरंटी जप्त करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदोष यंत्रणा यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. महावितरण स्टॅण्डर्ड आॅफ परफॉर्म्स पाळत नाही. महाग वीजेमुळे उद्योग गुजरात वा अन्य राज्यात गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असे वसई वीज ग्राहक संघटनेचे जॉन परेरा यांनी सुनावणीत म्हटले. (प्रतिनिधी)>या दरवाढीस विरोध करणारे ४६६ अर्ज दाखल झाले होते. या सुनावणीस वसईतून जनता दल (से.), निर्भय जन मंच, वसई वीज ग्राहक संघटना असे तीन अर्ज दाखल झाले होते.पालघर, बोईसर, नवी मुंबई, सातारा, ठाणे असे राज्यभरातून अर्ज दाखल झाले होते आणि सुनावणीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.
महावितरणाच्या दरवाढीस वसईत विरोध
By admin | Published: August 04, 2016 2:39 AM