लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी माणसाने गायीचे मांसही खाल्ले आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली होती. सावरकरांचे नाव घेऊन सत्तेत बसणाऱ्यांना त्यांची शास्त्रशुद्ध भूमिका मान्य नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव, डॉ. विनायक पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांना ‘फुले-आंबेडकर साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. विष्णू वाघ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिजाताई राठोड यांना ‘फुले-आंबेडकर युवा साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. अजित भिलारे, अरुण ननावरे, लक्ष्मण ढोणे यांनाही गौरविण्यात आले. संसदीय कार्याची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पवार यांचाही सत्कार करण्यात आला.शरद पवार म्हणाले, ‘मांस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धावून जाणारे तथाकथित गोरक्षक आणि त्यांना पाठीशी घालून संरक्षण देणारे राज्य सत्तेतील काही घटक अशी विचित्र परिस्थिती आज देशात पाहायला मिळत आहे. वाहनातून नेण्यात येणारे मांस हे गायीचेच आहे, असा आरोप करून वाहनचालकांना वेठीस धरले जाते. मात्र, विचारांवर उभी राहिलेली सामूहिक शक्ती अशा प्रकारांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सर्व लहान व अल्पसंख्याक घटकांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. यातून देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.’
‘आरएसएसचा अजेंडा मान्य नसल्याचे मोदींनी स्पष्ट करावे’-‘सध्याच्या घडीला गायीचे महत्त्व वाढून माणसांची किंमत कमी होऊ लागली आहे. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद करण्याचा प्रयत्न निषेध करण्यायोग्यच आहे. ‘सबका साथ सबका विकास...,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मात्र त्यांच्या बोलण्यावर अल्पसंख्याकांचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या धोरणांमध्ये आरएसएसचा अजेंडा डोकावत असून तो मान्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा स्पष्ट करावे,’ अशी मागणी भाई वैद्य यांनी या वेळी केली.