मुंबई : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या कारणावरून विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्या ऐवजी त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अभिरुप अधिवेशन भरवले. मात्र अध्यक्षांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी माईक, स्पीकर आणले गेले. खुर्ची, टेबल टाकण्यात आले. हे लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी सगळे साहित्य जप्त करायला लावले.पायऱ्यांसमोर चालू असलेले विरोधकांचे अधिवेशन बंद पाडल्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा माध्यमांसाठी केलेल्या जागेकडे वळवला. दिवसभर तेथेच विरोधकांनी ठाण मांडले. तेथे बसून सगळ्यांनी भाषणे केली. सकाळपासूनच विरोधकांनी पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी सुरू केली होती. अधिवेशन ११ वाजता सुरू झाले तेव्हा विरोधक सभागृहात आले नाहीत. मात्र सभागृहाबाहेर अधिवेशन भरवायचे या तयारीने आलेल्या विरोधकांनी विधान भवनाच्या दारावर अभिरुप विधानसभा, असे बॅनर लावले. माईक आणि स्पीकर आणले गेले. खुर्च्या टाकल्या गेल्या, टेबलही लावले आणि पायऱ्या व मोकळ्या जागेत हे अधिवेशन सुरू झाले.सभागृहात यावरून अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. बाहेर माईक, स्पीकर लावण्याची परवानगी घेतली होती का? अध्यक्षांना त्याबद्दल माहिती दिली होती का?, असे प्रश्न भास्कर जाधव यांनी केले. त्यावर आपली यासाठी परवानगी घेतली नव्हती, असे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले. त्यानंतर मात्र तालिका अध्यक्ष म्हणून स्वत: भास्कर जाधव यांना उपाध्यक्षांनी बोलावले. त्यामुळे स्वत:च केलेल्या मागणीवर स्वत:च आदेश देण्याची वेळ जाधव यांच्यावर आली. त्यांंनी मार्शलना सांगून सगळे साहित्य तातडीने जप्त करण्याचे आदेश दिले. तेव्हा चिडलेल्या भाजप आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली.
त्यांना परवानगी, माईक दिला कोणी? विरोधकांनी विधानसभागृहाच्या बाहेर अभिरुप विधानसभा भरवलीच कशी, त्यांना कोणी परवानगी दिली, माईकची व्यवस्था कोणी केली असा हल्लाबोल करीत सत्तारुढ पक्षाचे मंत्री व सदस्यांनी हा माईक तत्काळ काढून घेण्याची मागणी केली. त्यावर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तसे आदेश दिले.
भास्कर जाधव यांनी विरोधकांनी भरविलेल्या अभिरुप विधानसभेकडे लक्ष वेधत ही विधानसभा चॅनेलवर लाइव्ह कशी दाखविली जात आहे, विरोधकांना माईक कोणी पुरविला, परवानगी कोणी दिली असा सवाल केला. हा माईक तत्काळ काढून घ्या, विरोधकांना तिथून हटवा, सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींनी केली.