परभणी : न्या़ ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूसंदर्भात खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेस, कम्युनिस्ट व काही मीडिया हाऊसने देशाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसमोर केली. मुख्यमंत्री म्हणाले की, न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही माध्यम घटकांनी संशयाचे जाळे तयार केले. जणू काही या मृत्यूकरीता भाजपचेच कोणी तरी नेते जबाबदार आहेत, असे वातावरण तयार केल गेले. थेट वार करता येत नाही म्हणून अमित शहा यांच्यावर मागच्या मार्गाने वार करण्याचा प्रयत्न केला़ न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र सरकारने जो रिपोर्ट तयार केला होता, तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला आहे आणि एक प्रकारे मोठी चपराक काँग्रेसला लगावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर गडकरी म्हणाले, देशातील काही पक्ष व काही प्रसारमाध्यमांनी गलिच्छ राजकारण केले. न्यायालयाच्या निकालानंतर सत्य बाहेर आले आहे़ खोटा प्रचार करणाºयांसाठी न्यायालयाचा निकाल हे उत्तर आहे़
मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरलेअंबाजोगाई (जि. बीड) : गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आज ते नाहीत. हे दु:ख मनाला हेलावून टाकते. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असताना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृती आम्हाला कायम शक्ती देत राहतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी येथे केले. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले.