- कानिफनाथ गायकवाड
अहमदनगर - राज्यभर दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचे शासनाने जाहीर केले असताना वाढीव गुणांसाठी महत्वाची समजली जाणारी इंटरमिजिएट चित्रकला परिक्षा मात्र ऑनलाईन घेण्याचा घाट शासनाने घातला आहे. याला पालकांनी कडाडून विरोध केला आहे.
दि. 10 रोजी नवीन परिपत्रक काढून शासनाने हा निर्णय घामेतला आहे .ही परिक्षा 22/23 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठीची नाव नोंदणी 20 फेब्रुवारीपर्यंत करण्याचे पत्रकात म्हटले आहे. आता मुले दहावीच्या परिक्षेत व्यस्त असताना या चित्रकलेच्या परिक्षेची कार्यवाही करण्यासाठी वेळ कसा देणार यावर विद्यार्थी व पालक वर्गात संभ्रम आहे.
जी परिक्षा प्रात्यक्षिक स्वरुपात द्यावी लागते ती ऑनलाईन घेणे तसेच ग्रामीण भागात नेट मोबाईल असे अनेक अडचणी असताना असे ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेणे योग्य नाही. यास अहमदनगर कलाशिक्षक संघटनेने कडाडून विरोध केला आहे. मागील आठवडय़ात संघटनेची बैठक झाली. यामध्ये एकमताने या अशा स्वरुपाच्या परिक्षेस विरोध असल्याचे निवेदन जिल्हाअध्यक्ष संजय पठाडे यांनी दिले आहे. सध्या दहावीचे विद्यार्थी पुर्व आणि सराव परिक्षा तसेच विज्ञानाची प्रात्यक्षिक परिक्षा देण्यात वेस्त आहेत अशात हि मुले वाढीव गुणांसाठी चित्रकलेची इंटरमिजिएट परिक्षा कशी देणार हा प्रश्न पालकांना पडला आहे. शासनाकडून जाणून बुजून कला विषयाकडे दुर्लक्ष करण्याचा यातून प्रकार दिसत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष संजय पठाडे यांनी व्यक्त केले आहे.
दोन वर्षापुर्वी एलिमेंटरी परिक्षा झालेल्या आहेत त्या परिक्षेचा निकालही विद्यार्थ्यांकडे आहे तेच गुण वाढीव गुणांसाठी ग्राह्य धरावे अशी मागणी जिल्हा संघटनेने केली आहे. यावर शासनाने विचार करुन पालक आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी संघटनेने केली आहे.