ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ - विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आलेले आहेत. माझ्या नावावर ३ डायरेक्टर आयडेंटीफिकेशन नंबर (डी.आय.एन.) असल्याचा त्यांचा दावाही हास्यास्पद आहे. माझ्याकडे नियमाप्रमाणे केवळ एकच डी.आय.एन. नंबर असून ही वस्तुस्थिती मिनिस्ट्री आॅफ कंपनी अफेअर्सच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. राज्यातील भाजपा सरकारवर खोटेनाटे आरोप करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. विधिमंडळाचे अथर्संकल्पीय अधिवेशन तोंडावर आले असून या अधिवेशनात विरोधकांकडे सरकार विरुद्ध कुठलाही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे अशा प्रकारचे तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेत. मी ज्या कंपनीवर संचालक आहे त्याचा आणि मंत्री पदाचा कुठलाही परस्पर संबंध नाही. तसेच मंत्री या नात्याने मी कोणताही फायदा कंपनीसाठी करून घेतलेला नाही असेही तावडे यांनी स्पष्ट केले.विखे पाटील मोठा शोध लावल्याच्या आवेशात माझे ३ डी.आय.एन. नंबर असल्याचा आरोप केला. त्यातील पहिला डी.आय.एन.नंबर ०१४२७३७५ हा रद्द झाला होता. त्यानंतर दुसरा डी.आय.एन. नंबर ०२६१८०२३हा व्यपगत झाला आहे. त्यामुळे माझ्या नावावर ०१७२०२८४ हा एकच डी.आय.एन. नंबर असल्याचे तावडे यांनी सांगितले. मंत्री पद स्वीकारल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळावरून राजीनामा द्यावा असा कुठलाही कायदा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचे आरोप धादांत खोटे- शिक्षण मंत्री विनोद तावडे
By admin | Published: February 26, 2016 8:57 PM