Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: देशात सध्या मोदी विरूद्ध विरोधक असा संघर्ष हळूहळू अधिक तीव्र होत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी अमेरिकेत आहेत तर दुसरीकडे आज बिहारच्या पाटण्यामध्ये सुमारे १५ विरोधी पक्षांनी एकत्रित मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुखे उद्धव ठाकरे यांनीही सहभाग नोदंवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारला हटवण्यासाठी आम्ही सारे लोक एकत्र आलो आहोत, असा सूर विरोधकांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना आळवला. पण अशा मेळाव्यांचा काहीही फायदा होणार नाही, असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरच्या फळीतील नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेला हा मेळावा म्हणजे मोदी हटाव मेळावा नसून परिवार बचाव मेळावा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती एकाच मंचावर आल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले.
"विरोध पक्ष एकत्र येत आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न २०१९ ला पण झाला होता, तेव्हाही हे लोक एकत्र आले होते, पण फायदा झाला नाही. भारतातील लोक पंतप्रधान मोदींना साथ देत आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की NDA मागच्या पेक्षाही मोठ्या संख्येने यावेळी यश मिळवेल. पाटण्यात जी बैठक सुरू आहे, ती मोदी हटाव नव्हे, तर 'परिवार बचाव' बैठक आहे. सगळे परिवार एकत्र आलेत आणि परिवार वाचवत आहेत. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं म्हणजे धंदा आहे. भाजपाकरता सत्ता म्हणजे सेवा करण्याचे काम आहे, पण हे सर्वजण आपल्या कुटुंबाकडे सत्ता कशी राहिल यासाठी एकत्र आले आहेत" अशा खरपूस शब्दांत फडणवीसांनी विरोधकांच्या मेळाव्याचा समाचार घेतला.
"२०१९ ला देखील हे विरोधक एकत्र आले होते. पण जनता मोदींच्या पाठीशी हे आम्ही तेव्हा पाहिले. २०२४ला मागच्यापेक्षा मोठं यश मिळवू असा आम्हाला विश्वास आहे. अशा प्रकारचे मेळावे केले तर काही फायदा किंवा परिणाम होणार नाही. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की भाजपला मेहबुबा मुफ्तींसोबत केलेल्या युतीवरून टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या बाजूलाच बसलेत. त्यामुळे स्वत:चा परिवार वाचवण्यासाठी आणि परिवारवादी पार्टी वाचवण्यासाठी सगळ्या तडजोडी करायला हे लोक तयार आहेत. पण त्यांनी काहीही केले तरी त्याचा फायदा होणार नाही," असेही फडणवीस म्हणाले.