पिंपरी : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीनेच सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. विरोधक खोटा दावा करीत आहेत. तिघे मिळून निवडणूक लढवूनही भाजपच मोठा पक्ष ठरल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केला.
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात झाली. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महापौर उषा ढोरे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री अशोक उईके, माजी मंत्री ओमप्रकाश दुर्वे, खासदार भारती पवार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, वैभव पिचड या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सध्याचे सरकार तीन पक्षांचे आहे. दोन जणांसाठी असलेल्या कोचवर तिघे बसले आहेत. या तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत. निवडणुकीत तिघे एकत्र आले तर काय होईल? असा प्रश्न विचारण्यात येत होते. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तिघे एकत्र येऊनही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विरोधक आम्हीच मोठा विजय मिळविल्याचा करीत असलेला दावा खोटा आहे.
आदिवासींनी जल, जंगल आणि जमीन संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निसर्गाचा समतोल राखण्याची संस्कृती त्यांनी उभारली. मात्र, इंग्रजांनी विरोधी कायदे करीत त्यांना उपेक्षित केले. काही जमातींना तर त्यांनी गुन्हेगार ठरविले. त्याविरोधात बिरसा मुंडा या युवकाने संघर्ष उभा केला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी दिवस म्हणून जाहीर करावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
-----
सध्याचे सरकार मालखाऊआमच्या सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट सध्याचे सरकार घालत आहेत. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करीत होतो. मात्र, सध्याच्या सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी कडवट टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याणकारी योजना बंद करणारे तुम्ही कोण, असा जाब सरकारला विचारणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी चालेल, अशी पुष्टी फडणवीस यांनी जोडली.