अनगाव : ‘चिमुकल्यांचा जीव टांगणीला...’ या मथळ्याखाली २९ डिसेंबरच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच भिवंडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अरुणा जुईकर यांनी त्याची दखल घेतली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प, भिवंडी-२चे प्रकल्प विकास अधिकारी हणमंत दोडके यांना अंगणवाडीची पाहणी करून अहवाल सादर करावा तसेच चिमुकल्यांची पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोडके यांनी तत्काळ मडक्याचा पाड्यातील मोडकळीस आलेल्या अंगणवाडीची पाहणी केली आहे आणि तिथे शाळा भरणे बंद करून पर्यायी व्यवस्था केली आहे.तालुक्यातील मडक्याचापाडा (कासपाडा) या १०० टक्के आदिवासी गावातील मोडकळीत आलेल्या अंगणवाडीविषयी तक्रारी करूनही साधी दुरुस्तीसुद्धा ग्रामपंचायत कवाड व प्रकल्प विभागाने केली नव्हती. त्यामुळे येथील बालकांसह अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीसही जीव मुठीत धरून वावरत होत्या. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठवल्याने आता या शाळेला प्रकल्प अधिकाऱ्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पडेलकर, ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील, सुपरवायझर सौ. जाधव, पंसा कासपाडाचे अध्यक्ष मुकेश भांगरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ती इमारत पूर्णपणे धोकादायक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कासपाडा येथील इंदूबाई सापटे यांच्या घरात भाडेतत्त्वावर जागा घेऊन शाळी भरवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मोडकळीस आलेली अंगणवाडी नव्याने बांधण्याकरिताचा प्रस्ताव जि.प. ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प विकास अधिकारी हणमंत दोडके यांनी दिली. (वार्ताहर)
‘त्या’ अंगणवाडीला पर्यायी जागा
By admin | Published: January 05, 2015 4:51 AM