मुंबई : दक्षिण - पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा हवामानात उल्लेखनीय बदल झाले आहेत. या हवामान बदलामुळे २ डिसेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषत: १ डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुंबई परिसरातदेखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
असा आहे अंदाज१ डिसेंबर : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. शिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, जालना या जिल्ह्यांसाठीही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर जाणवेल. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. - शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग