अकोला : राज्यात हॉर्टसॅप प्रकल्प राबविला जात असून, राज्यातील प्रमुख फळ पिकांवरील रोग आणि किडींचे सर्वेक्षण करणे, या प्रकल्पामुळे सोपे झाले आहे. या प्रकल्पाच्या सल्ल्यानुसार फळ पिकांचे व्यवस्थापन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा संत्रा फळ पिकाला फायदा होत आहे. विदर्भात ७९,३४८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा पिकावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत फलोत्पादन विभागामार्फत राज्यात हॉर्टसॅप प्रकल्प राबविला जात आहे. सद्यस्थिती राज्यातील २३ जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून, यामध्ये आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिकू या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकात येणारी कीड व रोगांचे सर्वेक्षण करू न शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत असल्याने शेतकरी वेळीच उपाययोजना करतात. त्याचा उत्पादन वाढीस फायदा होत असल्याचे चित्र आहे.याच प्रकल्पांतर्गत शेतकरी व कृषी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे, राज्याचा कृषी विभाग व राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र तसेच इतर राष्ट्रीय संशोधन केंद्राद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे.संत्रा फळ पिकासंदर्भात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना या प्रकल्पाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुखाकडून फळ पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जात आहे.
संत्रा पिकाला फायदेशीर ‘हॉर्टसॅप’!
By admin | Published: May 02, 2017 12:31 AM