- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर न्यायालयांबाबत अवमानजनक मजकूर लिहिणाऱ्या आय. के. चुगानी यांना १४ आॅगस्ट रोजी स्वत: किंवा वकिलामार्फत उपस्थित होण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिला. चुगानी हे मुंबई येथील रहिवासी आहेत.चुगानी यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून बिनशर्त क्षमा मागितली आहे. तसेच, हे प्रकरण मुंबई येथे स्थानांतरित करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना अर्ज दिल्याचे कळविले आहे. उच्च न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणीदरम्यान या पत्राचा लिफाफा न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांच्याकडून सर्वांसमक्ष उघडून घेतला. अॅड. भांडारकर यांनी पत्र वाचून चुगानी यांचे म्हणणे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रबंधक कार्यालयाला या पत्राच्या खरेपणाची शहानिशा करण्यास सांगून चुगानी यांना वरीलप्रमाणे आदेश दिला.काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाविषयी अतिशय आक्षेपार्ह भाषेत पोस्ट टाकल्या जात होत्या. या पेजमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत होता. ही बाब निदर्शनास येईपर्यंत सुमारे तीन लाख फेसबुक युजर्सनी या पेजला भेट दिली होती. परिणामी न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत चुगानी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने अन्य प्रतिवादी फेसबुक, टिष्ट्वटर, यूट्यूब व गुगल यांना यावर पुढच्या तारखेपर्यंत उत्तर मागितले आहे.
सोशल मीडियावर अवमान करणाऱ्याला हजर होण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:15 AM