मुंबई : मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट यांच्या देखरेखीखालीच वर्गीकृत औषधांची विक्री केली जावी, अशी कायदेशीर तरतूद आहे. तरीसुद्धा काही मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट यांच्या गैरहजेरीत औषधांची विक्री केली जाते. असे काही प्रकरणी निदर्शनास आल्याने याबाबत पडताळणीसाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे १३ ते २० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरातील २४६ दुकांनाना औषध विक्री बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या मोहिमेमध्ये राज्यात विभागनिहाय करण्यात आलेल्या तपासण्या आणि ज्या किरकोळ औषध विक्रेत्यांकडे रजिस्टर फार्मासिस्ट तपासणीच्या वेळी उपलब्ध नव्हते. या कालावधीत राज्यभरात ३४६० तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी २७७ ठिकाणी फार्मासिस्ट गैरहजर आढळून आले. त्यापैकी २४६ औषध विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. २७७ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असून त्यांच्यावर परवाने रद्दसारखी सक्त कारवाई घेण्यात येत आहे.
एखाद्या औषध विक्रेत्यांकडे काही कालावधीसाठी रजिस्टर फार्मासिस्ट नसल्यास त्यांनी त्या कालावधीत औषधांची विक्री करू नये व त्यांचे दुकान बंद ठेवावे. यापुढे जर रजिस्टर फार्मासिस्ट यांच्या गैरहजेरीत वर्गीकृत औषधांची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील याची सर्व औषध विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. ग्राहकांनीसुद्धा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर आणि विक्री बिलासह औषधांची खरेदी करावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
तर त्वरित तक्रार कराग्राहकांना फार्मासिस्टच्या गैरहजेरीबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक संबंधित सहआयुक्त /सहायक आयुक्त यांच्या कार्यालयात किंवा hqfdadesk13@gmail.com या ई-मेलवर तक्रार करू शकता.