लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘गो ग्रीन’ योजनेत सहभागी होत वीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला, तर त्यांना प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यास सुरुवात झाली आहे.
ज्या ग्राहकांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना महावितरणच्या वेबसाइटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाइल ॲपवरूनही नोंदणी करता येते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठवला जातो. त्यामुळे संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. त्यानंतर ग्राहकाला त्याने दिलेल्या ई-मेल आयडीवर लिंक पाठविली जाते. लिंकवर क्लिक करून पडताळणी केली की प्रक्रिया पूर्ण होते. पुढच्या बिलापासून बिले ई-मेलने येते.
पेपरलेस व्यवहारावर भर दिला असून, त्या दिशेने काम सुरू केले आहे. गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी. प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी.- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण