शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

आदेश... आदेश आदेश..!

By admin | Published: December 13, 2015 1:23 AM

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांची जाहीर सभा... केवळ एवढ्या सूचनेवर लाखालाखांच्या सभा व्हायच्या. अत्यंत शिवराळ वाटाव्या, अशा भाषेतली ती भाषणे लाखालाखांचा जनसमुदाय

- नंदकुमार टेणीशेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांची जाहीर सभा... केवळ एवढ्या सूचनेवर लाखालाखांच्या सभा व्हायच्या. अत्यंत शिवराळ वाटाव्या, अशा भाषेतली ती भाषणे लाखालाखांचा जनसमुदाय भारून टाकायची. सभा संपली की, शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड, रामचंद्रबापू विनंती करायचे. पत्रकार मित्रांनो, सभेची बातमी देताना तुमच्या भाषेत बातमी द्या. आम्ही ती भाषा वापरतो, ती नाईलाज म्हणून कारण गुराढोरात, मातीचिखलात राबणाऱ्या, रांगड्या शेतकऱ्यांना तीच भाषा कळते, म्हणून वापरावी लागते. आम्ही त्याप्रमाणे बातमी द्यायचो मग दुसऱ्या दिवशी शरद जोशींचा फोन न चुकता दुपारपर्यंत यायचा. आभार मानण्यासाठी.शरद जोशी यांनी स्वत: शेती केली होती. अंगारमळा येथे त्यांनी सुपीक जमीन घेतली होती. त्यांच्या मनात शेतकऱ्यांचे नेते व्हायचे हे कधीही नव्हते. त्यांना शांतपणे निवृत्तीपर आयुष्य शेतीमध्ये प्रयोग करून जगायचे होते. त्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्र आणि मंत्र याचा वापर आत्मसात केला होता, परंतु एवढे सारे केल्यानंतरही शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार ठरते, हा अनुभव त्यांना व्यथित करून गेला. शेतमालाला रास्त भाव म्हणजे प्रचलित भावापेक्षा थोडा जास्त भाव. हे समीकरण त्यांनी मोडून काढले. उत्पादन खर्चावर आधारित भाव, त्यात शेतकऱ्याचे, त्याच्या मजुरांचे आणि शेतीसाठी वापरलेल्या प्राण्यांच्या कष्टाचेही दाम समाविष्ट असले पाहिजे. शेतकऱ्याची पत्नी, मुले त्या शेतात राबत असतील, तर त्यांच्याही कष्टाचे दाम त्यात अंतर्भूत असले पाहिजे. अशी नवी मांडणी त्यांनी केली. उद्योगधंदे जर संकटात सापडले, तर त्यांना दिलेल्या कर्जाची त्याच्या परतफेडीची जशी पुनर्रचना केली जाते, सवलती दिल्या जातात. त्याच पद्धतीने शेतीला दिलेल्या कर्जाचीही परिस्थितीनुसार फेररचना व्हावी, ही मागणी त्यांनी पूर्ण करून घेतली. कोणतीही सवलत अथवा कर्जमाफी किंवा व्याजमाफी शेतकऱ्यांना देऊ नका, त्यांना फक्त त्यांच्या घामाचे रास्त दाम द्या, अशी मागणी करणारा असा हा क्रांतिकारी नेता होता. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ८० टक्के मंत्री शेतकऱ्यांची मुले, भारताच्या मंत्रिमंडळात तेवढेच मंत्री शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेले. शेती हा राष्ट्रीय व्यवसाय, रोजगार आणि अर्थव्यवस्थेचा कणा तरीही शेतकरी उपेक्षित का? या त्यांच्या प्रश्नाचे कोणाकडेही उत्तर नव्हते. त्यामुळेच त्यांचे आंदोलन प्रभावी ठरले.१९८४ ची ही गोष्ट. त्यावेळी मी नाशिकच्या रामभूमीत सहसंपादक होतो. अत्यंत जोमाने सुरू झालेल्या आणि नाशिक जिल्ह्यातच फोफावलेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे वृतांकन करीत होतो. दिंडोरी, कळवण, सटाणा, निफाड, देवळा, चांदवड येथे होत असलेल्या लाखालाखाच्या सभांचे वृतांकन करीत होतो. कोणतीही जाहिरात नाही, प्रचार नाही, अशा स्थितीत कुठेतरी एक किंवा दोन बोर्ड लागायचे. आदेश, आदेश, आदेश! तेवढ्या बोर्डवरच लाखो शेतकरी सभेसाठी जमायचे.राज्यसरकारने कांद्याची हमी भावाने खरेदी करावी यासाठी त्यांनी आंदोलन उभारले, परंतु नेमक्या याच सुमारास पावसाळी वातावरण निर्माण झाले. कांदा भिजला तर नुकसान होईल. त्यामुळे आंदोलन संपवून यार्डावर कांदा न्या आणि मिळेल त्या भावात विकून घरी जा. नाहीतर देशोधडीला लागाल, असा प्रचार कांद्याच्या व्यापाऱ्यांनी व दलालांनी सुरू केला. त्यामुळे शेतकरी चलबिचल झाले. यार्डावर कांदा मागच्या बाजूने जायला लागला, हे कळताच शरद जोशींनी त्यांना थोपविण्यासाठी धाव घ्यावी असे ठरले, पण मग आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला असता शरद जोशींच्या सौभाग्यवती त्यांची जागा घेण्यास तयार झाल्या व त्यांनी आंदोलनाची धुरा काही काळ सांभाळली. जोशींनी त्या शेतकऱ्यांना थोपविले व तो लढा यशस्वी केला.जेव्हा त्यांनी उसाला रास्त भाव देण्यासाठी आंदोलन सुरू केले. टनाला ३०० रुपये भाव हवा अशी मागणी १९८० मध्ये केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी बागायतदारांचे नेते म्हणून त्यांची खिल्ली उडविली होती, परंतु कांद्यासारख्या पिकाचे उत्पादन जे शेतकरी घेतात त्यांच्यासाठीही त्यांनी उभारलेल्या या लढ्यामुळे त्यांच्या या टीकाकारांना उत्तर मिळाले होते. मी तुमच्या दाराशी कधी मते मागायला आलो, तर मला जोड्याने मारा, माझी गाढावावरून धिंड काढा, असे आपण प्रारंभीच्या जाहीर सभेत लाखालाखाच्या समुदायाला सांगायचा आणि मग आपण राजकीय पक्ष कशासाठी काढला, या प्रश्नावरही ते म्हणाले होते की, राजकीय पक्ष काढणे ही माझी हताशता आहे. एवढ्या प्रचंड जनशक्तीला संघटित केले की, कोणत्याही पक्षाचे असो ते सरकार झुकेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, अशी माझी आशा होती, परंतु ती फोल ठरली. त्यामुळे मला नाईलाजाने राजकीय पक्ष काढण्याची भूमिका घ्यावी लागली. भारतीय अर्थकारण, कृषी क्षेत्र, कृषी पतपुरवठा या सगळ्याचे चित्र एकहाती बदलवून टाकण्याचा चमत्कार घडविणारा हा नेता होता. तो आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेले दीड दशक ते विस्मृतीच्या आड असले, तरी त्यांचे कार्य मात्र सदैव स्मरणात राहील.(लेखक ‘लोकमत’च्या ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)