मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून नुकसान भरपाई सुद्धा दिली जाईल असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.
थोरात म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होते. विशेष करून फळबागाचे सर्वाधिक नुकसान होते. ज्यात द्राक्ष,आंबे यांचं समावेश आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भागातील सर्वेक्षण केले जाणार असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहे. त्यांच्याकडून जसा अवहाल येईल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे थोरात म्हणाले.
याचवेळी त्यांनी केंद्रसरकारवर सुद्धा निशाणा साधला. या आधीची अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याचा सुद्धा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र यात केंद्रसरकारचा मोठा वाटा असतो, त्यामुळे त्यांनी ती मदत केली पाहिजे. परंतु त्यांच्याकडून ती मदत अजूनही मिळाली नाही. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे त्यांची मदत आल्यास फायदा होईल असेही थोरात म्हणाले.