मुंबई : आशीषकुमार सिंग हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव असताना त्यांच्या मंत्रालयातील दालनात दुरुस्तीची कामे करताना झालेल्या भ्रष्टाचाराची दखल विभागाने आता घेतली असून संबंधित कंत्राटदाराकडून ६ लाख ६ हजार ३१० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.लोकमतने या भ्रष्टाचाराचे वृत्त २० सप्टेंबर रोजी दिले होते. आशीषकुमार सिंग हे आता अन्य विभागात बदलून गेले असले तरी या वृत्ताची गंभीर दखल त्यांनी घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधितांकडे त्यांनी या विषयीची नाराजी बोलून दाखविली होती. या प्रकरणाची चौकशी अधीक्षक अभियंता; बांधकाम मंडळ; मुंबई यांनी केली होती व त्यांनी भ्रष्टाचारावर अहवालात बोट ठेवले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाने आता एक परिपत्रक काढून संबंधित कंत्राटदाराकडून न केलेल्या कामासाठी त्याला प्रदान करण्यात आलेल्या ६ लाख ६३१० रुपयांची वसुली तत्काळ करण्यात यावी. तसेच, जादा बिल रक्कम कंत्राटदारांना अदा करणारे अधिकारी कोण होते याची नावेही विभागाने मागविली आहेत. या भ्रष्टाचाराच्या आधी झालेल्या चौकशीत ५० हजार ५९६ रुपयांचे बिल कंत्राटदारास कामे न करताच देण्यात आल्याचे म्हटले होते. तथापि, अधीक्षक अभियंत्यांच्या चौकशी अहवालानुसार आता संबंधित कंत्राटदारांकडून ६ लाख ६ हजार ३१० रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:03 AM