ठाणे : पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणाऱ्या पती महाशयांनी तिच्या कारचा मात्र हट्ट सोडला नाही. अखेर, या प्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध आधी श्रीनगर पोलीस ठाण्यात, त्यानंतर न्यायालयीन लढा दिला. न्यायालयानेही तिची बाजू मान्य करून, तिची कार तिला पुन्हा देण्याचे आदेश दिले.स्वरदा यांचा विवाह कळवा येथील स्वप्निल कांबळे यांच्याशी २७ डिसेंबर २०१३ रोजी झाला. एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या स्वरदा यांनी त्यांच्या वापरासाठी ३ नोव्हेंबर २०१५ रोजी कार खरेदी केली. त्यानंतर, २०१६ मध्ये स्वरदा आणि त्यांचे पती हे कळवा येथे भाडेतत्त्वावरील घरात राहायला गेले. स्वप्निल याने स्वत:चे काहीच सामान न घेता, स्वरदाला मात्र तिचे सर्व सामान घेण्यास सांगितले, परंतु महिनाभरानंतर तो अचानक घरातून निघून गेला. त्याच दिवशी स्वरदादेखील आपले सामान आणि स्वत:ची गाडी घेऊन आपल्या आईकडे ठाण्यातील किसननगर येथे निघून गेली. ५ मे २०१६ रोजी त्यांनी आपली गाडी घराजवळील एका मैदानात उभी केली होती, परंतु दुसऱ्या दिवशी ती तिथे नव्हती. शोधाशोध केल्यानंतर कळव्यातील मनीषानगर भागात त्यांच्या पतीच्या घराजवळ ती दिसली. त्यानुसार, आपल्या गाडीची त्यांनी पतीकडे मागणी केली. त्यावर, कुठेही तक्रार कर, गाडी परत करणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. तक्रार केल्यास बघून घेण्याचीही धमकी त्याने दिली. त्यानंतर, त्याने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने, स्वरदा यांनीही त्याच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने तिची कार परत करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गाडीचे डाउन पेमेंट आणि हप्ते भरल्याचेही तिने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. (प्रतिनिधी)
पत्नीची कार परत करण्याचे आदेश
By admin | Published: December 22, 2016 4:00 AM