मुंबई : सर्वसाधारण रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणाचा खर्च यापुढे महापालिका उचलणार आहे. यासाठी पुढच्या वर्षापासून एक कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.महापालिकेच्या रुग्णालयात गरीब रुग्ण उपचार घेत असतात. राज्य सरकारच्या अवयवदान समितीच्या मेरिटवरील अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाकडे पैसे नसल्यास प्रत्यारोपण होत नाही. त्यामुळे अवयव दान करणाऱ्या दात्याचे अवयव फुकट जातात. परिणामी पालिका रुग्णालयात अवयवदानाची संख्याही कमी आहे. जनजागृती होत असली तरी निधीअभावी प्रत्यारोपण होऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेनेच हा खर्च उचलावा; त्यासाठी पालिकेच्या बजेटमध्ये तरतूद करावी, अशी मागणी आरोग्य समितीच्या बैठकीत सर्वपक्षाच्या सदस्यांनी केली. त्यानुसार पालिका बजेटमधे एक कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. (प्रतिनिधी)>अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. हा खर्च अवयव प्रत्यारोपण करून घेणाऱ्याला करावा लागतो.>अवयव दात्याचे अवयव फुकट न जाता गरजू लोकांना हे अवयव वेळेवर मिळणे शक्य होणार आहे.- प्रशांत कदम, अध्यक्ष, आरोग्य समिती
अवयव प्रत्यारोपणाचा खर्च पालिका उचलणार
By admin | Published: September 20, 2016 2:24 AM