अमरावती, दि. 24 - महाअवयवदान महोत्सव 29 व 30 आॅगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या जनजागृतीसाठी शासन आता ‘महाअवयदान अभियान’ राबविणार आहे.
महाअवयवदान महोत्सव 2017चे नियोजन राज्यभरातून व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे. यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विभागीय समितीचे अध्यक्ष विभागीय महसूल आयुक्तांनी 18 आॅगस्ट रोजी जिल्हा समितीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हास्तरीय समितीसोबत नियोजन केले. जिल्हाधिका-यांनी जिल्हा समिती व तालुकाध्यक्षांसमवेत 23 आॅगस्ट रोजी महाअवयवदान कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील नियोजन केले. अलीकडे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. त्यासाठी जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी, याकरिता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन मागील वर्षीदेखील अभियान राबविण्यात आले होते. त्यापार्श्वभूमिवर यंदाही अवयवदान महोत्सव जागृती अभियान विविध विभागांमार्फत राबविल्या जाणाºया उपक्रमांचे मार्गदर्शन शासन निर्णयाव्दारे करण्यात आलेले आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत महाअवयवदान जागृतीबाबत महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, यांच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा प्रस्ताव होता.
अशी राहणार अवयवदान प्रतिज्ञा-माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे. पीडितांच्या व गरजुंच्या जीवनात आनंद फुलविणे हीच माणुसकीची खरी शिकवण असल्याची माझी श्रद्धा आहे. अवयवदानामुळे गरजू रूग्णांच्या जीवनात आनंद फुलविणे शक्य होते. तसेच मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. यावर माझा विश्वास आहे.
मी प्रतिज्ञा करतो की, माझ्या शरीरातील जे अवयव दुसºया मानवाच्या जीवनात आनंद फुलवू शकतील, अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल. माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकार्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असा आग्रह आहे. माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरत राहीन आणि पुढील पिढ्यांवर असेच संस्कार घडावेत, यासाठी मी प्रयत्नशील राहीन.