अकोला : भारतीय रेल्वे बोर्डाच्या विकास विभागाने जैविक प्रक्रियेवर आधारित शौचालय (हायब्रिड व्हॉक्युम शौचालय) विकसित केले आहे. प्राथमिक चाचणीनंतर या शौचालय प्रक्रियेचा प्रत्यक्ष उपयोग प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये केला जाणार असून, रेल्वेचे हे संशोधन म्हणजे ‘स्वच्छ-भारत’च्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे. हायब्रिड व्हॉक्युम शौचालयाची निर्मिती करताना रेल्वेच्या संशोधकांनी विमानात वापरल्या जाणाऱ्या डिझाइनचा वापर केला आहे. बंद टाकीमध्ये असलेले जिवाणू त्यात जमा होणाऱ्या मल-मूत्राचे रूपांतर प्रथम द्रव आणि नंतर वायूमध्ये करतील. पारंपरिक आणि जैविक यांची तुलना केल्यास पारंपरिक शौचालयांमध्ये प्रत्येकवेळी १0 ते १५ लीटर पाण्याचा उपयोग केला जातो. मात्र, जैविक शौचालयात केवळ ५00 मिलिलीटर पाणी वापरले जाते. पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न रेल्वे संशोधकांनी याद्वारे केला आहे. पहिल्या टप्प्यात काही विशेष प्रवासी गाड्यांमध्ये या शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेने विकसित केले जैविक शौचालय
By admin | Published: September 22, 2015 1:31 AM