मुंबई : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यासाठी शिक्षण परिषदेच्या शिक्षण कट्ट्याने पुढाकार घेत कल्याणमधील कॅप्टन ओक हायस्कूलच्या सभागृहात २९ नोव्हेंबर रोजी स. १०.३० वाजता खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात मुंबई आणि ठाण्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षण कट्ट्याच्या प्रतिनिधीने सांगितले. राज्य शासनाने नेमलेल्या ‘दफ्तराचे ओझे उपाययोजना समिती’चे सदस्य रमेश खानविलकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दफ्तराच्या वाढत्या भारामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठीचे, मानेच्या स्नायूंचे आजार बळावल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली होती. या समितीने दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनेक शिफारशी सुचविल्या असून या शिफारशींची अंमलबजावणी शाळांमध्ये कशा प्रकारे करावी, यावरही कट्ट्यावर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षणतज्ञांनी सुचविलेल्या सूचना व शिफारशींवर पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तिकेचे वितरण शाळांमध्ये करण्यात येईल. शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन शिक्षण कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.
दप्तराच्या ओझ्याबाबत खुल्या चर्चेचे आयोजन
By admin | Published: November 26, 2015 2:41 AM