ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - तामिळनाडूतल्या जलिकट्टूनंतर आता राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तसे आश्वासन दिले आहे.
गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेश काढण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधीनींना आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू, असे आश्वासन दिले.
'बैलगाडा स्पर्धा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील असून, आचारसंहिता असल्याने सध्या निर्णय घेता येणार नाही', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती खासदार आढळराव-पाटील यांनी दिली. तमिळनाडूच्या धर्तीवर राज्यातही बैलगाडीच्या शर्यतींना पाठिंबा देणार असून, २७ तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बजेटवरील चर्चेतही हा मुद्दा मांडू, असे आढळराव-पाटील म्हणाले.