ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 14 - भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लेखक प्रशांत पोळ यांच्या भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, पुस्तकाचे लेखक प्रशांत पोळ, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय विज्ञानाचा पाया हा शाश्वत विकासावर आधारित आहे. यामध्ये कला, शास्त्र, खगोल, भूगोल, गणित, भूमिती, यांत्रिकी, गती अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. तो अतिशय शास्त्रशुद्ध आहे. आपल्याकडे पाश्चिमात्य देशाकडून शास्त्र आणि विज्ञान आले, असा आपला समज आहे. पण या सर्व शास्त्रांचा विचार भारतीय विज्ञानात केला गेलेला आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय विज्ञानात एकात्म भाव आहे. निसर्गाशी साधर्म्य आहे. हा भाव निसर्गाचे जतन आणि संवर्धन करणारा आहे. या पुस्तकात केलेली मांडणी अतिशय चांगली आहे. ही मांडणी नव्या पिढीला आपल्या विज्ञानाबाबतची नवी माहिती देऊ शकेल. तरुण पिढीला प्रेरित करेल.भारतातील विविध शास्त्रे अतिशय प्रगत होती. त्यासाठी भारतीय वैज्ञानिक ज्या परिमाणांचा वापर करीत होती, त्याचा अभ्यास केला असता आपल्याला आजही थक्क व्हायला होते. सुश्रुत यांनी प्लास्टिक सर्जरीबाबत केलेले संशोधन किंवा धातुशास्त्राबाबत केलेली प्रगती ही भारतीय विज्ञान प्रगत असल्याची चिन्हे आहेत. यावर अजून संशोधन आणि लिखाण होण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. प्रशांत पोळ यांनी भारतीय विज्ञान अतिशय प्रगत होते हे पुराव्यासहित सिद्ध केले आहे. त्यांचे हे पुस्तक भारतीय विज्ञानाकडे आपल्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडते. त्यांचे हे पुस्तक नव्या पिढीला अतिशय उपयुक्त आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. गो. बं. देगलूरकर यांचीही भाषणे झाली. लेखक प्रशांत पोळ आणि प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन आरती आत्रे यांनी तर आदित्य घाटपांडे यांनी आभार मानले.
भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ - मुख्यमंत्री
By admin | Published: May 14, 2017 9:29 PM