अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले.
महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजाने अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे. कालीचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं आहे.
कालीचरण महाराज हा मूळचा अकोल्याचा रहिवाशी आहे. अकोला जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्याचे कुटुंबीय राहतो. बालपणीच अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण याचं मूळ नाव अभिजीत सराग असे आहे. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत.
लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्याला 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजने २०१७मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल-
२६ डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कालीचरण महाराज हा फर्जीबाबा- मंत्री नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजावर हल्लाबोल केला आहे. "अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा" असं म्हटलं आहे. बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही" असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.