श्रीकांत शेलार,
दांडगुरी- रायगडमधील श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. मात्र पेशवेकालीन ऐतिहासिक खुणा आजही या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र केवळ सरकारच्या दुर्लक्षामुळे हे शहर विकासापासून वंचित आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धन चित्पावन घराण्यातील पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणाऱ्या श्रीवर्धन येथे पेशवे घराण्याची पिढीजात देशमुखी होती, असा इतिहास सांगतो. त्यामुळे इतिहासप्रेमी तसेच ऐतिहासिक ठेवा जाणण्याची इच्छा असलेले पर्यटक आजही श्रीवर्धनला आवर्जून भेट देतात. श्रीवर्धन येथे बाळाजी विश्वनाथाच्या वाड्याच्या चौथऱ्याचे काम विशिष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. श्रीवर्धन नगरपालिकेने १९८८ मध्ये ‘श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर’ उभारले आहे. त्याच्या आतील बाजूस १.५२ मी. उंचीच्या चौथऱ्यावर तेवढ्याच उंचीचा बाळाजी विश्वनाथचा पूर्णाकृती कांस्य पुतळा आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागावर बाळाजींचा चित्रवृत्तान्तचा उल्लेख आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूस ब्रह्मेंद्रस्वामी आणि उजव्या बाजूस छत्रपती शाहू महाराज यांचे अर्धपुतळे आहेत. सद्य:स्थितीत श्रीवर्धन शहरात श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर असा फलक लाऊन तटबंदी केलेला परिसर आहे. श्रीवर्धनला येणारे पर्यटक पेशव्यांचे ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येतात. पण येथे पेशव्यांच्या स्मारकाशिवाय ऐतिहासिक असे काही नसल्याने त्यांचा हिरमोड होतो. पेशव्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात त्यांचे कर्तृत्व दर्शवणारी विशेष ओळख असावी, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. >सुशोभीकरणाची गरजपेशवे मंदिर परिसरातील सहा गुंठे जागा ही स्मारकासाठी आरक्षित आहे तर उर्वरित जागा ट्रस्टच्या नावे आहे. भविष्यात येथे पेशवे मंदिर उभारण्यासाठी या दोन्ही जागांचे आरक्षण सुधारित नियोजन आराखड्यात करण्यात आल्याचे समजते. ही जागा सुशोभित केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास स्थानिकांना आहे.