ऑलाइन लोकमतसोलापूर: सोलापूरच्या रेल्वेस्थानकावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरिसाहून मुंबईकडे निघालेल्या नऊ मुलींना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. यात मुख्य सूत्रधार पळून जाण्यात यशस्वी ठरला. प्राथमिक तपासात या मुलींना सूत्रधाराकरवी शिक्षणाचे आमिष दाखवून नेले जात असल्याची माहिती पुढे आली आहे; मात्र या मुलींचा देहविक्रीसाठी वापर करण्याच्या हेतूने मुंबईला नेले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दृष्टीने तपास जारी आहे. ओरिसा राज्यातील आजूबाजूच्या गावातील १४ ते १७ वयोगटातील अल्पवयीन नऊ मुलींना एक इसम कोणार्क एक्स्प्रेसने मुंबईला घेऊन जात असल्याची माहिती सोलापूरच्या गुन्हे शाखेला सायंकाळी मिळाली. या धर्तीवर गुन्हे शाखेने महिला पोलिसांच्या पथकांना सोलापूरच्या रेल्वेस्थानकावर तैनात केले. सोबत आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी होते. सायंकाळी सातच्या सुमारास कोणार्क एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आली. पोलिसांनी रेल्वेतील डबा क्र. १० मध्ये जाऊन चौकशी करताना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या वर्णनानुसार नऊ मुली आणि एक इसम आढळला. त्यांना ताब्यात घेताना तो इसम पळून जाण्यात यशस्वी झाला. नऊ मुलींना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्यात आणले. संबंधित मुलींची चौकशी करताना प्राथमिक तपासात या मुलींना शिक्षणाचे आमिष दाखवून मुंबईला नेले जात असल्याची माहिती मिळाली. ही कारवाई पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधिकारी अनिल जगताप यांच्यासह आरपीएफचे निरीक्षक आशिषकुमार सिन्हा, सचिनकुमार, पवनकुमार आणि हवालदार अजय चौरासिया यांनी केली. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या़---------दोन तास कसून चौकशी ताब्यात घेतलेल्या नऊ मुलींना रात्री पावणेआठ वाजता सदर बझार पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्या मुली घाबरल्या होत्या. पोलिसांनी त्यांना धीर देऊन चौकशी करताना त्यांनी तोडमोडक्या हिंदी भाषेत माहिती देताना ह्यकोर्स के लिये वो आदमी हमे मुंबई ले जा रहा थाह्ण असे सांगितले.----------साहित्यांची तपासणी पोलिसांनी त्या मुलींच्या बॅगांची तपासणी केली असता त्यात शैक्षणिक साहित्य, कपडे, खाद्यपदार्थ व पाण्याची बाटली सापडली. यातील एकाही मुलीकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट सापडले नाही. ताब्यात घेतलेल्या मुली वेगवेगळ्या गावच्या असल्याने प्रत्येकाकडून वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने नेमका काय प्रकार आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. -----सीसी टीव्ही फुटेज तपासणारत्या मुुलींना मुंबईला घेऊन जाणारा पिवळ्या रंगाचे टी शर्ट परिधान केलेला इसम पसार झाल्याने त्याला पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असून, त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेण्यात येणार असल्याचे सहा. पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले.-------मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताताब्यात घेण्यात आलेल्या मुलींची कसून चौकशी करीत असून, या चौकशीत देहविक्री करणाऱ्या मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच शेजारच्या उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून देहविक्री करणारे प्रकरण गाजत आहे. तेथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे आणि ताब्यात घेतलेल्या मुलींचे काही कनेक्शन आहे याचाही तपास सुरु आहे. -----संबंधित मुलींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली आहे. मुलींना घेऊन जाणारा आरोपी फरार झाला आहे. संबंधित मुलींशी संभाषण करताना भाषेचा अडसर निर्माण होत असून, दुभाषीमार्फत चौकशी करणार आहोत. -शर्मिष्ठा वालावलकरसहा. पोलीस उपायुक्त
ओरिसाच्या नऊ अल्पवयीन मुली पोलिसांच्या ताब्यात.
By admin | Published: July 11, 2016 11:03 PM