ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 4 - पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात खासदार राजू शेट्टी उतरल्याचे कळल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय नको म्हणूनच मी दुस-या विश्रामगृहाकडे गेलो होतो. यामध्ये शेट्टींपासून दूर जाण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.
शुक्रवारी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शेट्टी आल्याचे समजल्यानंतर खोत यांनी तेथून आपला मुक्काम दुसरीकडे हलवला होता. त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. शनिवारी खोत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. राजू शेट्टी पुणे येथे आल्याचे समजल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना जादा जागा मिळावी म्हणूनच मी तेथील पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहाकडे गेलो. यामध्ये शेट्टी यांना टाळण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेदनाहीत आणि आमच्यात कोणत्याही प्रकारची दरी निर्माण झालेली नाही.
आम्ही एकत्रच असून, भविष्यातही एकत्रच राहू. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. संघटनेत पूर्वी होतो आणि भविष्यातही असेन.खा. शेट्टी यांच्याशी असलेल्या वादावर स्मितहास्य करून, आम्ही दोघे एकच असून, जे काही बोलायचे, ते बोललो आहे. आता आणखी काही बोलणार, असे सांगत ते जिल्हाधिका-यांच्या दालनात निघून गेले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सदाभाऊंनी शब्द फिरविला
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सदाभाऊ खोत यांनी रयत विकास आघाडीच्या चार सदस्यांचा भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत नानासाहेब महाडिक गटाने नाराजी व्यक्त केली होती. खासदार राजू शेट्टी यांनीही पाठिंब्याबाबत निर्णय झालेला नसून, बैठकीनंतर ठरवू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर दहा दिवसांनी शनिवारी सदाभाऊ खोत सांगलीत आले ते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पाठिंब्याबाबत विचारले. रयत विकास घाडीच्या सदस्यांचा पाठिंबा कोणाला देणार, या प्रश्नावर सदाभाऊंनी शब्द फिरवत आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊनच निर्णय होईल, असे विधान केले.