मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. भाजप-शिवसेना यांच्या युतीची चर्चा सुरु असून तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा निर्णय झाला आहे. तर मनसेने सुद्धा १२५ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रमुख पक्षातील नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना आमचा पर्याय उपलब्ध असणार असल्याचा खुलासा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता तटस्थ राहण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यांनतर विधानसभा निवडणूक सुद्धा ते लढवणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असून, सुमारे १२५ ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा राज ठाकरेंच्या सभा गाजणार असल्याचे निश्चित झाले आहे.
युती आणि आघाडीच्या पक्षातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिकीट न मिळलेल्या इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्वाचा पक्षातील नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना आमचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील बंडखोर पुढील काळात मनसेमध्ये जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिकमधील मतदारसंघावर मनसेचा अधिक जोर असणार आहे. या सबंधी उमेदवारांच्या सभा सुद्धा झाल्या आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभा सुद्धा होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज यांचा 'लाव रे तो व्हिडिओ'चा फॅक्टर कितपत चालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.